India Morning News
नागपूर : नागपुरात शनिवारी सकाळी एक थरकाप उडवणारी घटना घडली. प्रवाशांनी गच्च भरलेल्या एसटी बसमधून अचानक धूर निघू लागल्याने क्षणात गोंधळ उडाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि काहींनी घाबरून थेट खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पळ काढला.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना डीसीपी झोन-२ कार्यालयाजवळील परिसरात घडली. नागपूरवरून सुटलेली एसटी बस रस्त्यात असताना अचानक इंजिन भागातून धूर निघू लागला. काही सेकंदांतच धुराचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा जीव भंडावून गेला.
बसचालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि इंजिन बंद केले. त्याचवेळी प्रवासी आरडाओरडा करत बाहेर धावू लागले. काहींनी खिडक्यांतून उड्या मारत आपले प्राण वाचवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. तपासात असे निष्पन्न झाले की शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागली होती. घटनेनंतर विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी बस डेपोमध्ये परत बोलावून तिची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक नागरिक आणि चालक यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि “लाल परी” राख होण्यापासून थोडक्यात वाचली.









