India Morning News
सांगली :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकारणात तापमान वाढलं आहे. तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुक नेतेमंडळींनी पक्षातील वरिष्ठांची पायरी चढण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष तर काही ठिकाणी पक्षांतराची चळवळ सुरू आहे. या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान आता एका आमदाराच्या “लेटरबॉम्ब”ने भाजपच्या अंतर्गत वादाला अधिक हवा मिळाल्याचं दिसतंय. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनीच हा ‘लेटरबॉम्ब’ टाकला असून, त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.
पत्रातून व्यक्त झाली नाराजी-
आगामी सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर गाडगीळ यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून जागावाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यांच्या या पत्रामुळे सांगलीतील भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.
जयश्री पाटील गटाला 22 जागा?
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या जयश्रीताई पाटील यांच्या गटाला तब्बल 22 जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयावरच गाडगीळ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेसमधून फक्त सहा नेतेच भाजपात आले असताना, 22 जागा कुणासाठी राखून ठेवताय? असा सवाल गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी-
या जागावाटपाच्या निर्णयामुळे स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गाडगीळ यांनी जाहीरपणे सांगितले की, “ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलं, त्यांनाच मागे टाकून बाहेरून आलेल्यांना तिकीट देणं हा अन्याय आहे.” त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
भाजपात गटबाजीची चिन्हं स्पष्ट-
या लेटरबॉम्बमुळे सांगली भाजपात ‘गाडगीळ गट विरुद्ध जयश्रीताई पाटील गट’ असा संघर्ष उफाळण्याची चिन्हं आहेत. निवडणुकीच्या अगोदर निर्माण झालेलं हे अंतर्गत संकट भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतं. पक्षातील एकजूट ढळल्यास सांगली महापालिका निवडणुकीत त्याचा थेट परिणाम भाजपाच्या कामगिरीवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार?
गाडगीळ यांच्या पत्रानंतर आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. पक्षातला हा असंतोष वाढू नये यासाठी कोणती पावलं उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.










