India Morning News
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ८% मतदारांची वाढ झाली असून, ही वाढ अत्यंत संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काही मतदान केंद्रांवर तर मतदारसंख्या २० ते ५० टक्क्यांनी वाढली, हे आकडेच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
मंगळवारी त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत भाजपवर थेट आरोप करत म्हटले की, “बीएलओंच्या अहवालांमध्ये अनेक अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नमूद आहे. माध्यमांनीही बनावट पत्त्यावर नोंदणीकृत मतदार उघड केले आहेत. मग निवडणूक आयोग गप्प का? की तोही या कटात सामील आहे?”
याआधीही राहुल गांधी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा फडणवीसांच्या मतदारसंघातील आकडे सादर करत त्यांनी भाजपच्या विजयावर थेट शंका व्यक्त केली आहे.
“ही हेराफेरी नाही, थेट मतांची चोरी आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित केला. जर यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर तो स्वतःचा गुन्हा मान्य केल्यासारखा ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने यावर तोडगा म्हणून ‘मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी’ व सीसीटीव्ही फुटेज तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे.










Comments are closed