Shopping cart

  • Home
  • News
  • तुमसर नगरपरिषदेत तेली समाजाचे प्राबल्य विविध पक्षांत एकापेक्षा अधिक सक्षम उमेदवार चर्चेत

तुमसर नगरपरिषदेत तेली समाजाचे प्राबल्य विविध पक्षांत एकापेक्षा अधिक सक्षम उमेदवार चर्चेत

November 1, 20250 Mins Read
Tumsar Municipal Council
67

India Morning News

Share News:
Share
  • निवडणुकीचा आखाडा तापला!
  • सर्वच राजकीय पक्ष नगराध्यक्ष पदासाठी तेली समाजातील उमेदवाराच्या शोधात

तुमसर  : होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमसर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठीचा राजकीय आखाडा सज्ज झाला असून त्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी तयारीचे जरी रणशिंग फुंकले असले तरी तुर्तास नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्ष तेली समाजातील उमेदवाराच्या शोधात आहेत.

कुबेर नगरी समजल्या जाणाऱ्या तुमसर नगरीत तेली समाजाचे खूप मोठे प्राबल्य असून अख्ख्या तुमसर शहरात तब्बल २२ हजार मतदार असून, हे शहरातील सर्वात मोठे मतदार संघटन मानले जात आहे. तुमसर शहराचा इतिहास बघता व तेथील विशेषतः नगर परिषद निवडणुकीचे आकलन केले असता असे दिसून येते की तुमसर शहरात तेली समाजाचे तुमसर शहरात एक प्रकारचे सम्राज्य दिसून येते. त्यानंतर शहरात कुणबी समाजाचे केवळ सुमारे ७ हजार मतदार आहेत, इतर मध्ये एस सी, मुस्लिम समाजांचे मतदान त्यापेक्षा कमी म्हणजे ३ ते साडे ३ हजार मतदान आहे. परिणामी कोणत्याही पक्षाला नगराध्यक्ष पदावर दावा ठोकायचा असल्यास, तेली समाजाच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिल्या शिवाय पर्याय नाही कारण तेली समाजाचे मत निर्णायक ठरणार हे निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षांतून तेली समाजातील एकापेक्षा अधिक सक्षम उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. काहीजण अनुभवी, तर काही नव्या पिढीतील ऊर्जावान आणि समाजकार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत. या उमेदवारांमध्ये आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, “या वेळी नगराध्यक्ष पदावर तेली समाजातीलच व्यक्ती परत बसण्याची शक्यता प्रबळ आहे.” समाजाचे संख्याबळ, मतदानातील एकजूट आणि सामाजिक प्रभाव लक्षात घेता, कोणताही पक्ष या समाजाला दुर्लक्ष करू शकत नाही.

दरम्यान, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व अजित पवार गट) दोन्ही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिंदे गट, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी आतापासूनच तेली समाजातील प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी समाजातील नेत्यांना भेटी देणे, विकासाच्या वचनांचा पाऊस पाडणे आणि मतदारांशी संवाद साधणे असे प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “तेली समाज जर एकवटला, तर निवडणुकीचा निकाल पहिल्याच फेरीत ठरेल.” त्यामुळे शहरातील आगामी राजकारण हे तेली समाजाच्या दिशेने झुकलेले दिसत असून, कोणता पक्ष हा समाज आपल्याकडे खेचतो, यावर संपूर्ण निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share