India Morning News
अमरावती – सात दिवसांच्या उपोषणानंतर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्या, तर सरकारविरोधात मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल.
उपोषणामुळे बच्चू कडूंच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. अन्नत्यागामुळे त्यांचं वजन लक्षणीय घटलं होतं, आणि प्रकृती खालावल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली होती. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि दोन दिव्यांगांच्या हस्ते त्यांनी पाणी घेत आंदोलन थांबवलं.
सरकारकडून दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काही आश्वासने देण्यात आली आहेत. उदय सामंत यांनी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं सांगितलं आहे. याशिवाय, दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी ३० जून रोजी विशेष बैठक होणार असून सर्व मागण्यांबाबत लिखित आश्वासनही देण्यात आलं आहे.
बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं असलं, तरी ते पूर्णपणे थांबलेले नाहीत. सरकारने जर पुन्हा वेळकाढूपणा केला, तर ‘प्रहार स्टाईल’ने मंत्रालयात घुसून आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. ‘गांधीगिरी’तून सुरु झालेलं हे आंदोलन आता ‘भगतसिंगपथावर’ जाण्याची तयारी दाखवत आहे.
दरम्यान, १५ जून रोजी ठरलेलं राज्यभरातलं ‘रास्ता रोको’ आणि ‘चक्काजाम’ आंदोलनही रद्द करण्यात आलं आहे. बच्चू कडू म्हणाले, “सरकारने जर विश्वासघात केला, तर नागपूरवरून मुंबई गाठू – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणेच आंदोलन छेडू.”
त्यांच्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी किमान दरावर २० टक्के अनुदान, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना १० लाखांची मदत, संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपयांचं मासिक मानधन, आणि धनगर समाजासाठी आरक्षणाचा तातडीने अंमल, अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.










Comments are closed