India Morning News
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासातून एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, हा स्फोट दिल्लीसाठी नव्हता, तर दहशतवाद्यांचे खरे लक्ष्य अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि वाराणसीतील धार्मिक स्थळे होती. या ठिकाणांवर मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचला गेला होता.
तपासातून समोर आले आहे की, या कारवाईसाठी दहशतवाद्यांनी अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू ठेवली होती. मात्र, अयोध्येतील नियोजित स्फोट घडवण्याआधी काही तांत्रिक कारणांमुळे योजना फसल्याने त्यांनी घाईघाईत दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणला. स्फोटात वापरलेली सामग्री बांगलादेश आणि नेपाळमार्गे भारतात आणण्यात आली होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अयोध्या आणि वाराणसीमध्ये ‘स्लीपर सेल’ तयार केले होते. शाहीन नावाच्या एका महिलेनं अयोध्येत या टोळीचा नेटवर्क सक्रिय केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने सुरक्षा यंत्रणांनी वेळेत कारवाई करून हा मोठा कट हाणून पाडला आणि संभाव्य भीषण हल्ला टळला.
स्फोटाशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या स्फोटात टायमरचा वापरच नव्हता. आरोपी उमर स्वतः गाडी चालवत होता आणि स्फोट होण्यापूर्वी ती गाडी जवळपास तीन तास लाल किल्ल्याजवळ उभी होती. या सर्व घडामोडींमुळे तपास यंत्रणांनी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत जवळपास २,९०० किलो स्फोटके जप्त केली असून, अजून सुमारे ३०० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात उच्च सतर्कता जारी करण्यात आली असून, संभाव्य दहशतवादी नेटवर्कचा शोध सुरू आहे.










