India Morning News
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय यांचा आगामी आणि शेवटचा चित्रपट ‘जन नायगन’ प्रेक्षकांच्या भेटीला ९ जानेवारी २०२६ रोजी येणार आहे. एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट विजयच्या चित्रपटसृष्टीतील अंतिम प्रवासाचं प्रतीक ठरणार आहे, कारण यानंतर ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर ‘जन नायगन’बाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या सॅटेलाइट हक्कासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा करार केला असून, हा करार सन टीव्ही या वाहिनीसोबत करण्यात आला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सॅटेलाइट हक्कांसाठी ही आजवरची सर्वाधिक रक्कम मानली जात आहे.
याआधी चित्रपटाचे ओटीटी हक्क अमेझॉन प्राइम व्हिडीओने १२१ कोटी रुपयांना विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. इतकंच नाही तर, थलापती विजयने या चित्रपटासाठी २७५ कोटी रुपयांची फी घेतल्याचं मनी कंट्रोलने स्पष्ट केलं आहे, जी आजवर भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वाधिक कलाकार-फी ठरली आहे.
चित्रपटाच्या कथानकाविषयी देखील चर्चांना उधाण आले असून, ‘जन नायगन’ हा नंदमुरी बालकृष्ण यांच्या ‘भगवंत केसरी’ (2023) या चित्रपटाचा रिमेक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यासंबंधी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
या भव्य चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत बॉबी देओल, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन, वरलक्ष्मी सरथकुमार, प्रियमणी, नारायण, ममिता बैजू आणि मोनिशा ब्लेसी यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थलापती विजयच्या चित्रपटसृष्टीतील निरोपाचा हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि संस्मरणीय अनुभव ठरणार आहे, यात शंका नाही.










Comments are closed