India Morning News
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला सध्या गंभीर जलसंकटाचा सामना करत आहे. ऐतिहासिक गंगासागर आणि हत्ती तलाव आटल्याने राज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या व्यवस्थेबाबत मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
प्रत्येकवर्षी गंगासागर तलावातील पाणी राज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमासाठी तसेच किल्ल्यावर होणाऱ्या विकासकामांसाठी वापरले जात असे. मात्र यंदा पावसाअभावी तलावात फारच कमी पाणी शिल्लक असून, रायगड विकास प्राधिकरणाला किल्ल्याच्या पायथ्यापासून टँकरच्या माध्यमातून पाणी वाहून आणण्याची योजना आखावी लागत आहे.
जलस्रोत आटले, पर्यटक वाढले-
दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत असूनही जलस्रोतांची देखभाल आणि संवर्धन करण्यात आलेले अपयश आता ठळकपणे समोर येत आहे. शनिवार-रविवारसारख्या सुट्ट्यांमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडावर दाखल होत असतात. परिणामी, गडावरील मर्यादित जलस्त्रोतांवर ताण अधिक वाढतो आहे. काही छोट्या पाणवठ्यांमध्ये थोडेसे पाणी शिल्लक असले तरी त्याचा उपयोग अत्यंत मर्यादित आहे.
पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची गरज-
या पार्श्वभूमीवर, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये गडावरील जलसंधारण प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गडाच्या ऐतिहासिकतेला धक्का न लावता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जलसंवर्धनाशिवाय पर्याय नाही-
रायगडासारख्या ऐतिहासिक वारशावर पर्यटनाचा भार वाढत असतानाच पायाभूत सुविधांचा विचार न केल्यास भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या आधीच तलाव आटल्याने यंदाच्या उन्हाळ्यात किल्ल्यावरील जलव्यवस्थापन मोठ्या संकटात सापडले आहे.
राज्याभिषेक दिनासमोर प्रश्नचिन्ह-
राज्याभिषेक दिन हा रायगडाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. अशा वेळी पाण्याच्या कमतरतेमुळे कार्यक्रमाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचवणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.








Comments are closed