India Morning News
नाशिक:-
राज्यातील कृषी अर्थव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे रसातळाला गेल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. नाशिक येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना त्यांनी कृषीमंत्र्यांना ‘ओसाड गावची पाटीलकी’ मिळाल्याची उपमा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
शेट्टी म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्या ११ वर्षांपासून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. या काळात कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित होते. मात्र, केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला उपेक्षित ठेवल्याने हा विभाग ओसाड पडला आहे. याला अजित पवार हेच जबाबदार आहेत.”
मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, केळी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेट्टी यांनी या पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच, मायक्रोफायनान्स कंपन्यांनी राज्यात धुमाकूळ घातल्याचा आरोप त्यांनी केला. “केंद्राने १२ टक्के सरळ व्याज आकारणीचे बंधन घातले असताना, या कंपन्या २२ ते २५ टक्के व्याज आकारून सामान्य कर्जदारांची लूट करत आहेत. राज्यात ७ कोटींहून अधिक कर्ज खातेदार असून, ३ लाख कोटींहून अधिक कर्जवाटप झाले आहे,” असे शेट्टी यांनी सांगितले.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना फसव्या योजनांच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. फळबाग लागवड अनुदान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, कंत्राटी कामगारांचे पगार, रोजगार हमी योजनेची मजुरी, विकासकामांची थकीत बिले यासह अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली गेल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिक जिल्हा बँक सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासकांनी प्रयत्न केले असले, तरी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखो शेतकरी आणि ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. “शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी सरकार बेफिकीर आहे,” अशी टीका शेट्टी यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढत असून, सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलने तीव्र करणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.







Comments are closed