India Morning News
नाशिक :-
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने देखील हालचालींना वेग दिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले. “नेत्यांमागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही. चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला.
या कार्यशाळेत बोलताना बावनकुळे यांनी पुढे म्हटले की, “१५ ऑगस्टनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चित होतील,” असा अंदाज व्यक्त करत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी जनतेसमोर मांडण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
“प्रत्येक मत महत्त्वाचं असून, कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांचा विजय हेच आमचं उद्दिष्ट आहे,” असा संकल्प बावनकुळे यांनी जाहीर केला. मोदी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय – जसे की लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचे निर्णय यांची उजळणी करत, ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
गिरीश महाजन यांचा आत्मविश्वास — ‘100 प्लस’चा निर्धार
याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ‘१०० पेक्षा अधिक जागा’ जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “युती झाली तर चांगलं, नाही झाली तरी भाजप स्वबळावर लढायला तयार आहे,” असा ठाम संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी नको, सर्वांनी एकसंघपणे काम करावं अशी सूचना महाजन यांनी केली. विशेष म्हणजे सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचा उल्लेख संभाव्य पालकमंत्री म्हणून करण्यात आल्याने काही चर्चांना उधाण आलं.
‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख-
बावनकुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचा उल्लेख करत मोदी सरकारच्या निर्धाराचे कौतुक केले. हा निर्णय दुसऱ्या कोणत्याही सरकारकडून अपेक्षित नव्हता,असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपने कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. चमक-धमक न करता प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संधी दिली जाईल, हे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केल्याने भाजप गोटात खळबळ उडाली आहे.








Comments are closed