India Morning News
नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये मोठा बदल घडवू शकणारे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. भारतावर लादलेल्या आयात शुल्काविषयी मंगळवारी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारताने जर रशियाकडून खनिज तेल खरेदी थांबवली, तर आम्ही टॅरिफ रद्द करण्याचा विचार करू.”
अलीकडच्या काही महिन्यांत अमेरिकेने भारतावर उच्च दराचे आयात शुल्क लादल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे टॅरिफविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अचानक मवाळ भूमिका घेतली असून, भारताशी पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवाद पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळत असून, यामुळे भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींना गती मिळू शकते.
ट्रम्प म्हणाले, “भारत सध्या माझ्यावर खूश नाही. पण आमचे संबंध पुन्हा सुधारतील आणि प्रेम वाढेल.” त्यांच्या या विधानानंतर भारतावरील टॅरिफ शिथिल किंवा रद्द होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकारण आणि रशिया-ऊर्जा समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.






