Shopping cart

  • Home
  • News
  • ‘क्लीन सिटी’चा नारा फसला; तुमसर नगरपरिषद झाली ‘कचरा सिटी’

‘क्लीन सिटी’चा नारा फसला; तुमसर नगरपरिषद झाली ‘कचरा सिटी’

November 10, 20250 Mins Read
98

India Morning News

Share News:
Share

तुमसर (भंडारा): ‘क्लीन सिटी – ग्रीन सिटी’ अशी घोषणा देणारी तुमसर नगरपरिषद आता प्रत्यक्षात ‘कचरा सिटी’ बनल्याची स्थिती नागरिकांना अनुभवावी लागत आहे. विकासासाठी कोट्यवधींचा निधी मिळत असतानाही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अद्याप कायम आहे.

नगरपरिषदेकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपयांचा खर्च केल्याचे दावे केले जातात, मात्र शहराच्या मुख्य भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पडलेले दिसतात. गांधीसागर तलाव परिसर, न्यायालय मार्ग, आणि गोवर्धन नगर या भागांत दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

गोवर्धन नगराजवळ शासनाचे कामगार कार्यालय आणि पॉश कॉलनी असतानाही परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. शहराबाहेरील टुमनी नाल्याजवळ डोंगरला मार्गावर कचऱ्याचा डेपो तयार करण्यात आला असला, तरी शहराच्या आतील भागात कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लागत नाही.

४५ हजार लोकसंख्येचे तुमसर शहर, जिल्ह्यातील क्रमांक दोनचे मानले जाते. निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये रोष आहे.

गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असल्याने, नगरपरिषदेत लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांचा सुस्त कारभार हे प्रमुख कारण मानले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी निवडणूक तयारीत व्यस्त असल्याने मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत.

राज्य सरकारकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी कचरा व्यवस्थापनासाठी मिळत असूनही, शहर स्वच्छतेत नगरपरिषद अपयशी ठरत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. निवडणुकीनंतर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share