India Morning News
पुणे:शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन महिलांची एकूण 44 लाख 9 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पहिली घटना: 52 वर्षीय महिलेची 33 लाखांची फसवणूक पहिल्या प्रकरणात, 52 वर्षीय महिलेला व्हाट्सअॅपवर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीसाठी लिंक पाठवण्यात आली. सायबर चोरट्यांनी एका ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगितले आणि भरघोस परताव्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडलेल्या महिलेने विविध बँक खात्यांमध्ये 33 लाख 49 हजार रुपये ट्रान्सफर केले. काही काळाने सायबर चोरट्यांनी संपर्क तोडला, तेव्हा महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दुसरी घटना: 35 वर्षीय महिलेकडून 10 लाख उकळले दुसऱ्या प्रकरणात, पाऊड रस्ता परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी तिला व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले आणि शेअर ट्रेडिंगसाठी लिंक व ॲप पाठवले. ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळत असल्याचे सांगून तिच्याकडून 10 लाख 60 हजार रुपये उकळण्यात आले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर चोरट्यांनी संपर्क बंद केला, त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिसांचा तपास सुरू
दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपींनी व्हाट्सअॅपवर विविध मोबाइल क्रमांकांद्वारे संपर्क साधून महिलांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. पैसे वर्ग झाल्यानंतर संपर्क थांबला. या प्रकरणी आयटी ॲक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड पोलीस सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत.
पोलिसांचे आवाहन
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या लिंकवर क्लिक करणे किंवा कोणत्याही ॲपवर पैसे गुंतवण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असे पोलिसांनी सुचवले आहे.











Comments are closed