India Morning News
मुंबई:- हिंदी सक्तीविरोधात आवाज उठविल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकावर जोरदार टीका केली आहे. आझाद मैदानात झालेल्या सभेत त्यांनी या विधेयकाच्या नावाखाली राजकीय विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
“आज जे सरकारमध्ये आहेत, त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात काहीही सहभाग नव्हता, पण आता कोणत्याही सरकारविरोधी मताला ते देशद्रोह ठरवतात,” असं म्हणत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा निर्घृण समाचार घेतला. “लोकसभेत ४०० जागा जिंकायच्या घोषणा केल्या, पण महाराष्ट्रात जनतेनं त्यांना झटका दिला,” असं ते म्हणाले.
ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचा दाखला देत भाजपने त्यावेळी लाल बावटा घेतलेल्या शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवल्याचं लक्षात आणून दिलं. “रक्तबंबाळ पायांनी मुंबईकडे येणाऱ्या गोरगरिब शेतकऱ्यांची शिवसेना नेहमीच साथ देईल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
अतिरेकी भाजपमध्ये गेले का?
“पहलगाम हल्ल्यानंतर जनसुरक्षा विधेयक आणायचा निर्णय घेता. पण खरे अतिरेकी गेले कुठे? जर ते भाजपमध्ये गेले असतील, तर तिथे गेल्यावर सगळं माफ कसं होतं?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात गेल्या १० वर्षांपासून अघोषित आणीबाणी असल्याचं म्हणत त्यांनी सत्तेच्या दुरुपयोगावर टीका केली.
“सभागृहात नाही, पण रस्त्यावर आमचं बळ”
“सत्ताधाऱ्यांकडे विधेयक मंजूर करण्यासाठी बहुमत असलं तरी रस्त्यावर जनतेचा पाठिंबा आमच्याकडे आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. “हिंदी सक्तीला विरोध केला तसाच या विधेयकालाही विरोध केला जाईल. राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
या वक्तव्यांमुळे विधीमंडळाच्या अधिवेशनात जनसुरक्षा विधेयकावरून जोरदार खल होण्याची शक्यता आहे.








Comments are closed