India Morning News
धाराशिव : राज्यात ठाकरे बंधूंमधील युतीच्या चर्चांना उधाण आले असताना, भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलमध्ये जाईल,” असा सूचक इशारा करत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोपाची तोफ डागली.
धाराशिव दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी डिनो मोरिया प्रकरणाशी संबंधित अनेक सूचनांनी वातावरण तापवले. त्यांनी स्पष्ट शब्दांत काहींची तुरुंगवारी निश्चित असल्याचं म्हटलं. या इशाऱ्यांमुळे ठाकरे गटात चिंता निर्माण झाली आहे.
डिनो मोरिया यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीचा धागा मुंबईतील नालेसफाई प्रकरणाशी जोडला जात असल्याचे बोलले जात आहे. डिनो मोरियाचे काही ‘निकट संबंध’ कोणासोबत होते, हे उपस्थित करत राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचं नाव सूचित केलं. “तो कुणासोबत बसायचा हे सगळ्यांना माहिती आहे,” अशा शब्दांत त्यांनी संशय व्यक्त केला.
तुरुंगवारीचं आधीच नियोजन
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “हीच कारणं आहेत की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगवता आहेत. ज्या लोकांचं भवितव्य कोर्टात ठरणार आहे, ते आता युतीच्या माध्यमातून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत. पण यावेळी काही लपणार नाही, पावसाळ्यात तुरुंगवारी ही ठरलेली गोष्ट आहे.”
युतीवरही तिरकस टिप्पणी, हिंदुत्व पुन्हा केंद्रस्थानी
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही राणे यांनी उपरोधिक शैलीत प्रहार केला. “एका बाजूला २० आमदार, दुसऱ्या बाजूला शून्य… आणि म्हणे आम्ही घाबरलो!” अशा शब्दांत त्यांनी युतीची खिल्ली उडवली. शिवाय, “हिंदुत्व सोडलं आणि ठाकरे ब्रँडच बुडाला,” असा घणाघात करत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
राणे यांच्या या विधानांमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असून, विरोधकांनी राजकीय हेतूंनी चौकशांचा वापर केल्याचा आरोप करत पलटवार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं दिसत आहेत.








Comments are closed