India Morning News
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंधांचा विषय अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विशेषतः नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा प्रभाव होता, असे अनेकदा बोलले गेले आहे. आता या विषयावर अभिनेत्री अनु अग्रवालनेही खळबळजनक वक्तव्य केले आहे.
‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटातून लोकांच्या मनात घर करणाऱ्या अनु अग्रवालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या अनुभवांची माहिती दिली. ती म्हणाली, “तेव्हा चित्रपटांचा बराचसा पैसा अंडरवर्ल्डकडून येत असे. हे व्यवहार अधिकृत नोंदणीशिवायच होत. निर्माता-दिग्दर्शकांना गुन्हेगारी जगताच्या दबावाखाली काम करावं लागायचं.”
अनु अग्रवालच्या म्हणण्यानुसार, त्या काळात अंडरवर्ल्डचा प्रभाव इतका होता की, अनेक कलाकार मानसिक तणावात राहत असत. बरेचसे आर्थिक व्यवहार गुप्तपणे चालत. ती म्हणाली, “माझ्याकडे ठोस पुरावे नसले, तरी मी जे काही पाहिलं आणि अनुभवलं ते मी मांडतेय.”
प्रसिद्धीमागचं कठीण वास्तव-
‘आशिकी’नंतर अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली. मात्र प्रसिद्धीमुळे तिला अनेक त्रास सहन करावे लागले. तिच्या फॅन्सनी तिच्या घरी गर्दी करणे, परदेशातून तिला भेटायला येणं, या सगळ्या गोष्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करत होत्या. ती एका सुरक्षायुक्त इमारतीत राहत होती, तरी विचित्र घटना घडत असत, असं ती म्हणाली.
शाहरुख खानच्या शेजारी राहत असताना मिळालेल्या लोकप्रियतेबाबतही तिने आठवण सांगितली. ‘गजब तमाशा’, ‘राम शास्त्र’, ‘किंग अंकल’सारख्या काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या एका गंभीर अपघातामुळे तिचं करिअर अचानक थांबले. अनु अग्रवालच्या या कबुलीनंतर बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे अनेक जुने वाद पुन्हा उजेडात येण्याची शक्यता आहे.









Comments are closed