India Morning News
बंगळुरू – IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पहिल्यांदाच जेतेपद मिळवल्यानंतर संघाचा भव्य विजयोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र या ऐतिहासिक उत्सवावर मोठी दुर्घटना घडून काळी छाया पडली. चिन्नास्वामी स्टेडियम आणि परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना बुधवारी संध्याकाळी घडली. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, RCB च्या विजयोत्सवासाठी जवळपास ८ लाख लोक स्टेडियम परिसरात एकत्र जमले होते. आयोजकांनी आणि प्रशासनाने केवळ २.५ लाख लोक येतील, असा अंदाज बांधला होता. मात्र, प्रत्यक्षात गर्दी अपेक्षेपेक्षा अनेक पटीने जास्त झाली. त्यामुळेच नियंत्रण सुटले आणि मोठा गोंधळ झाला.
या घटनेमागे मुख्य कारण ठरले ते RCB कडून केलेली “फ्री पास” ची घोषणा. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संघाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट टाकण्यात आली, ज्यात चाहत्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले गेले. ही माहिती मिळताच हजारो लोक स्टेडियमकडे धावले. विशेष म्हणजे या गर्दीसाठी कुठलाही स्पष्ट मार्गदर्शन, बॅरिकेडिंग, प्रवेश व्यवस्था किंवा सुरक्षा यंत्रणा तयार नव्हती.
गर्दी वाढत गेली आणि लोकांनी बॅरिकेड्स व गेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही लोक खाली पडले आणि त्यांना गर्दीने चिरडले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश तरुण होते. मृतांमध्ये १३ वर्षांची दिव्यांशी, १७ वर्षीय शिवलिंगा, १९ वर्षीय चिन्मयी, २० वर्षीय भूमी आणि प्रज्वल, २५ वर्षीय साहना, २७ वर्षीय अक्षता, २९ वर्षीय देवी, ३२ वर्षीय डोरेशा आणि ३३ वर्षीय मनोज यांचा समावेश आहे. हे सर्व जण बंगळुरू व परिसरातील जिल्ह्यांमधून RCB च्या ऐतिहासिक विजयोत्सवाला साक्षीदार होण्यासाठी आले होते.
गृहमंत्री परमेश्वर यांनी माहिती दिली की, या दिवशी बंगळुरू मेट्रोमार्गे तब्बल ८.७० लाख तिकिटांची विक्री झाली. यावरून स्टेडियम परिसरात ८ लाखांहून अधिक लोक उपस्थित होते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यांनी यावेळी स्पष्ट केलं की, विधान सौधावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल RCB संघाच्या स्वागतासाठी हजर होते. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. परिणामी, स्टेडियम परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवता आली नाही.
ही दुर्घटना RCB च्या विजयाच्या आनंदावर दुःखाची छाया टाकणारी ठरली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करताना सुरक्षेची योग्य पूर्वतयारी नसेल, तर आनंदाचे क्षण किती भयावह ठरू शकतात, याचे हे दुःखद उदाहरण आहे. या घटनेनंतर RCB संघ, कर्नाटक सरकार व आयोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.








Comments are closed