India Morning News
पुणे: यंदाचा नवरात्र उत्सव पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.दरवर्षी गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि मर्यादित वेळ यामुळे मनसोक्त आनंद घेता येत नाही. पण यंदा पुण्यात प्रथमच मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची भव्य ७० फूट उंच गोपुरासह हुबेहूब प्रतिकृती साकारली जाणार आहे. ही कलाकृती नवरात्रोत्सवात भक्ती आणि शिल्पकलेच्या वैभवाचा अनोखा संगम घडवणार आहे.
या भव्य प्रतिकृतीत मीनाक्षी मंदिरातील सुबक नक्षीकाम, पौराणिक कथा, देवता, संत आणि विद्वानांच्या शिल्पांचा समावेश आहे. मंदिरातील मंडपांतील खांबांवर कोरलेली सुसंस्कृत शिल्पकला, दाक्षिणात्य वास्तुशैलीचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, रंग, प्रकाश आणि भक्तीभाव यांचा अद्वितीय मिलाफ पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. मीनाक्षी मंदिराच्या या भव्य गोपुरासह दाक्षिणात्य परंपरेचं सौंदर्य आणि आध्यात्मिक अनुभव पुण्यात प्रथमच एकत्र येत आहेत.
या उत्सवाचं उद्घाटन सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन, पुणे येथे झाले. हा उत्सव पुणेकरांसाठी शिल्पकला आणि भक्तीचा अनोखा संगम घडवणारा ठरेल. याशिवाय, मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत आणि पारंपरिक दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधीही उपलब्ध असेल. नवरात्रोत्सवात या अनोख्या अनुभवासाठी नक्की भेट द्या आणि मीनाक्षी मंदिराच्या वैभवात रममाण व्हाल,असा अनुभव नक्की घ्याल.
- स्थळ: श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन, पुणे
- वेळ: सकाळी ९ ते रात्री १०
- प्रवेश:विनामूल्य
महाराष्ट्रातील जनता आणि पुणेकरांनो, या नवरात्रोत्सवात मीनाक्षी मंदिराच्या शिल्पकलेचा हा अनोखा अनुभव चुकवू नका.









Comments are closed