India Morning News
तुमसर (२१ जून, भंडारा) :-तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना गत १९ वर्षापासून बंद आहे. सदर कारखाना त्वरीत सुरू करण्यात यावा किंवा कारखान्यासाठी संपादित शेतकऱ्यांची ३०० एकर सुपिक जमीन त्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आले. तुमसर तालुक्यातील माडगी युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण करणारा कारखाना बंद असल्याने ३००० कामगार बेरोजगार झाले आहेत. या कारखान्यासाठी माडगी शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या सुपिक जमीनी दिल्या होत्या. ३०० एकरात हा कारखाना उभारला गेला. अभय योजनेंतर्गत कारखान्याला १५० कोटी वीजबिल माफ करून सवलती देण्यात आल्या आहे. परंतु त्यानंतरही हा कारखाना सुरु झाला नाही. ३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. १८ ऑगस्ट २००६ पासून कारखाना कायमचा बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटींचे वीज बिल थकित होते.
यापूर्वी एनटीपीसी येथे सवलतीच्या दरात कारखान्याला वीज पुरवठा करीत होती. सवलतीच्या दरात वीज पुरवठा बंद केल्याने गुंता वाढला होता. वीज वितरण कंपनीने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यास नकार दिला होता. कारखान्याकडे सुरुवातीला ५० कोटी रुपये थकीत होते. पुढे ती रक्कम वाढून २०० कोटी रुपयांपर्यंत गेली होती. दरम्यान कारखानदाराने १८ आगस्ट २००६ मध्ये क्लोजर करण्याचा निर्णय घेतला. २७८ कामगारांना क्लोजरची माहिती दिली.
कारखाना सुरु राहावा यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. मात्र प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडली होती. राज्य शासनाने आजारी कारखान्यासाठी अभय योजना सुरु केली. त्यानुसार युनिव्हर्सल (खंबाटा) फेरोने २०१४ मध्ये अभय योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कारखान्यावरील वीज बिल आर्धे माफ करण्यात आले. कारखानदाराने २०० कोटींपैकी ४८ कोटी रुपयांचे देयक भरले. केवळ कारखाना सुरु करण्याच्या अटीवर अभय योजनेचा लाभ मिळेल, असा करारनामा करण्यात आला होता. कारखाना सुरु करण्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली होती. २०१७ मध्ये तीन वर्षे लोटले तरीसुध्दा कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही. कारखानदाराने कराराचा भंग केला आहे. कारखान्याकडे ३०० एकर सुपिक जमीन पडून आहे. कारखानदाराने कारखाना सुरु करावे, अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांचे त्या जमीनी परत कराव्यात अशी मागणी आहे.
दोन वर्षापूर्वी शिवसेनेच्यावतीने युनिव्हर्सल (खंबाटा) फेरो माँग्निज शुद्धिकरण कारखाना सुरु करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. परंतु प्लांट मालकाने कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन युनिव्हर्सल कारखाना सुरू करुन तालुक्यातील बेरोजगारी दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कारखान्याने ४ एकर शेती विकत घेऊन त्याऐवजी नौकरी देऊन रोजगार दिले परंतु २००६ पासून कारखाना बंद करून बेरोजगार केले त्यामुळे आमच्याकडे शेती पण नाही आणि रोजगार पण हिरावून घेतला परिणामी उपासमारीची वेळ आली आहे याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींना वारंवार कारखाना सुरू करण्याची मागणी केली परंतु त्यांनी कायमच दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.
-फुकटु गणपत हिंगे, माजी कर्मचारी, युनिव्हर्सल फेरो खंबाटा, माडगी.
शासनाच्या अभय योजनेअंतर्गत कारखान्याचे १२० कोटी वीजबिल माफ़ केले परंतु शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या प्रति कसलीही सहानुभूती न दाखवता केवळ उद्योगपतींच्या फायदा करून शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आणली. या कारखान्याबाबत स्थानिक आमदार व खासदारांना बऱ्याचशा वेळी निवेदन देऊनही काहीच फायदा मिळाला नाही. उलट उद्योगपतींच्या फायदा झाला.
-अरुण शंकर कांबळे, माजी कर्मचारी, युनिव्हर्सल फेरो खंबाटा, माडगी.










Comments are closed