India Morning News
पुणे:- पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह तातडीची दूरदृश्य बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाची तातडीची बैठक
या बैठकीला प्रांताधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मयूर सोनवणे, हरिश्चंद्र माळशिकारे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट, निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान
स्वामी चिंचोली, खडकी, पाटस आणि दौंड परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे. पाणी साठल्याने शेतकऱ्यांची पेरणी वाहून गेली असून, याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश आमदार कुल यांनी दिले आहेत.
प्रशासनाची तत्परता
वीजपुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी महावितरणकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहून नागरिकांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार राहुल कुल यांनी सांगितले, “या संकटकाळात प्रशासन आणि नागरिकांनी एकजुटीने काम करावे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
संपर्क आणि सज्जता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासनाने पूर्ण सज्जता ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणींसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे









Comments are closed