India Morning News
पुणे:-
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे करण्यात आले. या चर्चासत्रात संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती” या माहिती पुस्तिकेचे विमोचन त्यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून सहभाग घेत उपस्थितांशी संवाद साधला.
ऊस लागवड क्षेत्रात घट; क्रशिंगमध्ये ११% घसरण
२०२३-२४ मध्ये देशात ५७ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. मात्र, २०२४-२५ मध्ये हे क्षेत्र ५३ लाख ५८ हजार हेक्टरवर घसरले, म्हणजेच ६.६५ टक्के क्षेत्रात घट झाली. त्याचप्रमाणे, २०२३-२४ मध्ये ३१५८ लाख मेट्रिक टन ऊस क्रशिंग झाले, तर २०२४-२५ मध्ये ते २८०८ लाख मेट्रिक टनांवर आले. यामुळे देशात क्रशिंगमध्ये ११ टक्के घट नोंदवली गेली. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. रिकव्हरीच्या बाबतीत, २०२३-२४ मध्ये देशाची सरासरी रिकव्हरी १०.१० टक्के होती.
AI चा वापर अपरिहार्य: अजित पवार
आर्थिक समस्यांचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. “साखर कारखानदारी टिकली पाहिजे, पिढ्यान्पिढ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. शेतकरी बांधव, सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखान्यांना शक्य ती सर्व मदत आमच्याकडून केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करूया,” असे आवाहन त्यांनी केले.
सहकारी साखर कारखानदारीसाठी AI चा वापर आवश्यक
राज्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी आणि शेतकरी बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी AI चा वापर सुरू करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात केले. “नवीन आव्हाने स्वीकारून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण ऊस शेती आणि साखर उद्योगाला नवे बळ देऊ शकतो,” असेही ते म्हणाले.
माहिती पुस्तिकेचे विमोचन
या चर्चासत्रात शरद पवार यांच्या हस्ते “कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती” या माहिती पुस्तिकेचे विमोचन झाले. या पुस्तिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीत कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Comments are closed