India Morning News
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ संपूर्ण स्वरूपात गायले जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “वंदे मातरम म्हणणं बंधनकारक करणं लोकशाहीविरोधी आहे.”
आझमींच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “भारत माता की जय म्हणायला नकार देणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही.” त्यांनी पुढे म्हटलं की, “वंदे मातरम हे फक्त गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचं प्रतीक आहे.”
भाजपचे राज्य माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही आझमींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “ज्यांना ‘भारत माता की जय’ म्हणणं मान्य नाही, त्यांनी भारत सोडावा.”
राज्य सरकारकडून सांगण्यात आले की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गाणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर विरोधकांचा आरोप आहे की हा निर्णय धार्मिक आणि राजकीय हेतूंनी प्रेरित आहे.
वंदे मातरमच्या १५०व्या वर्धापनदिनी हा वाद तापला असून, महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा संघर्ष रंगला आहे.







