India Morning News
मुंबई : महाराष्ट्र सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत राज्यभर देशभक्तीचा नाद पुन्हा एकदा घुमवला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता ‘वंदे मातरम्’ हे गीत संपूर्ण स्वरूपात गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिवंगत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अमर रचनेच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत शाळांमध्ये फक्त ‘वंदे मातरम्’ चे पहिले दोनच श्लोक गायले जात होते. मात्र, येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ पासून ७ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या विशेष उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण गाणे म्हणणे बंधनकारक असेल.
शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सूचना पाठवल्या असून, शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास, त्याची निर्मिती आणि स्वातंत्र्य चळवळीतली भूमिका यावर आधारित विशेष प्रदर्शने आणि सत्रांचे आयोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या उपक्रमामागील उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रनिष्ठा दृढ करणे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि, या निर्णयावर काही राजकीय पक्ष आणि नेते काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी काही गटांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गाण्याला विरोध दर्शवला होता आणि फक्त प्रारंभीचे दोन श्लोकच म्हणण्याची परंपरा ठेवली होती.
राज्य सरकारचा हा आदेश आता राज्यभरातील सर्व शाळांसाठी लागू होणार असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
‘वंदे मातरम्’चे १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीचा स्वर दुमदुमणार आहे.










