India Morning News
पुणे:- भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अमूल्य ठेवा असलेला योग शारीरिक स्वास्थ्यासह आत्मशांतीचा अनुभव देतो. जागतिक योग दिनानिमित्त पुण्यात आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या विशेष कार्यक्रमात हजारो वारकऱ्यांनी योगासने करत भक्ती आणि योगाची अनोखी सांगड घातली. या प्रसंगी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, कार्यक्रमाचे संयोजक राजेश पांडे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त
चंद्रकांत फुलकुंडवार, मनपा आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर, पुण्यनगरीत लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा भक्तीयोग कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भगवद्गीतेच्या “योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय। सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते” या श्लोकाचा संदेश या कार्यक्रमातून प्रत्यक्षात उतरला.
या कार्यक्रमात योगासनांसह भक्तिमय कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार भक्ती आणि योगाच्या संगमाने उपस्थितांना अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी योग आणि भक्तीच्या सामंजस्याचे महत्त्व विशद करत, वारकरी संप्रदायाच्या योगदानाचा गौरव केला.










Comments are closed