India Morning News
नागपूर:- विदर्भ राज्य आंदोलन समितीने महावितरण कंपनीच्या जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या धोरणाविरोधात आज नागपूरच्या व्हेरायटी चौकात दुपारी १२:३० वाजता आक्रमक निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी स्मार्ट प्रीपेड मीटरची प्रतिकृती जाळून तीव्र निषेध व्यक्त केला आणि सरकारला बळजबरीने मीटर लावू नये, अशी अंतिम चेतावणी दिली.
महावितरण कंपनीने नागपूर शहर आणि ग्रामीण भागात वीज ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा घाट घातला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने यापूर्वीच या मीटरला विरोध दर्शवला असताना, महावितरणने नाव बदलून ‘टीओडी’ (टाईम ऑफ द डे) मीटर म्हणून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. समितीने याला महावितरणचे षडयंत्र ठरवले आहे.
नागपूर जिल्ह्यातील १४.५ लाख वीज ग्राहकांचे अद्ययावत मीटर बदलून त्याजागी मोंटेकार्लो आणि जीनस कंपनीचे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे नियोजन आहे. या मीटरमध्ये उद्योगपतींची मोठी गुंतवणूक असून, त्यांना आपला पैसा वसूल करायचा आहे, असा आरोप समितीने केला आहे. विशेष म्हणजे, हे मीटर “विदाऊट कॅलिब्रेशन सर्टिफिकेशन” आणि “ओके टेस्टिंग रिपोर्ट” नसताना बसवले जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला. ग्रामीण भागात अशा मीटरमुळे वीजबिलात अव्वाच्या सव्वा वाढ झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

आंदोलनात पोलिसांशी चकमक
निदर्शनादरम्यान आंदोलकांनी “स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द करा”, “टीओडी मीटरच्या नावाने भूलथाप बंद करा”, “बळजबरीने प्रीपेड मीटर लावणे बंद करा”, “दिल्लीत आहे वीज स्वस्त, विदर्भाची जनता प्रीपेड मीटरने त्रस्त”, “ऊर्जामंत्री मुर्दाबाद” अशा गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही आंदोलकांनी ‘आपली बस’ रोखून धरली. अखेरीस पोलिसांनी कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस स्टेशनला नेले आणि गुन्हे दाखल करून काही तासांनी सोडले.
आंदोलनात सहभागी नेते
आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे, गुलाबराव धांडे, अमूल साकुरे, गिरीश तितरमारे, हरिभाऊ पानबुडे, राहुल बनसोड, प्यारुभाई नौशाद हुसैन, सतीश शेंद्रे, रहमान शेख, गणेश शर्मा, योगिता आगासे, अण्णाजी राजेधर, रवींद्र भामोडे, रामेश्वर मोहबे, चंद्रशेखर पुरी, संगीता उके, राजेंद्र सतई, युसूफ खान, अरविंद (बालु) मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, देश जनहित पार्टी), तारेश दुरुगकर, संजय सूर्यवंशी, मधुसूदन सपकाळ, यादव, शाहिद अली, नीलकंठ अंभोरे, मधुकर बालपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलकांचा इशारा
विदर्भ राज्य आंदोलन समितीने सरकार आणि महावितरणला इशारा देत सांगितले की, वीज ग्राहकांच्या मर्जीविरुद्ध स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा हट्ट सोडावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.









Comments are closed