India Morning News
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या दहशतवादावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका करत, त्यांच्या विधानाला असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस असे संबोधले आहे.
वडेट्टीवार यांचे वादग्रस्त विधान
एका पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते की, दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. त्यांच्या या विधानामुळे देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, विशेषतः काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील मानले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत म्हटले की, काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत? ‘दहशतवाद्याला जात-धर्म नसतो’ असं विधान करून वडेट्टीवार नेमकं कोणाला खूश करू पाहत आहेत? असा संतप्त सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
बावनकुळे यांनी आरोप केला की काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न किळसवाणा आहे. वडेट्टीवार यांचे वक्तव्य केवळ बेजबाबदारपणाचे लक्षण नाही, तर ते देशविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, असेही ते म्हणाले.
जनतेने निषेध करावा,भाजपचे आवाहन
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व देशभक्त नागरिकांना आवाहन करत म्हटले की, भारतीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेचा जोरदार निषेध करा. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण थांबवावे.
विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे उभ्या देशभरात रोष व्यक्त होत आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा बचाव केल्यासारखे भासणारे विधान केल्यामुळे काँग्रेसवर जबरदस्त टीकेची झोड उठली आहे. भाजपने या मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडले असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










Comments are closed