India Morning News
मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अलीकडच्या सलोख्याच्या हालचालींमुळे मनसे महाविकास आघाडीत येणार का, यावर चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, “मनसे हा काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळणारा पक्ष नाही. त्यामुळे त्यांना आघाडीत घेण्याबाबत कोणताही विचार नाही.”
वडेट्टीवारांच्या या विधानाने काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत संभाव्य युतीच्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
अलीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्याने, दोघांच्या राजकीय समीकरणांबद्दल चर्चा रंगल्या होत्या. मात्र काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ही शक्यता धूसर झाली आहे.
मनसेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी १२५ प्रभागांवर लक्ष केंद्रित केलं असून, माहीम, दादर, परळ, लालबाग, विक्रोळी, भांडुप यांसारख्या मराठी बहुल भागांमध्ये उमेदवारांची तयारी सुरू आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का बसल्याने संघटन पुन्हा उभारण्याचं आव्हान वाढलं आहे.
वडेट्टीवारांच्या या विधानामुळे मनसेच्या महाविकास आघाडीत प्रवेशाची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा पुढील प्रवास अनिश्चित राहणार आहे.




