India Morning News
मालेगाव : अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी नितीन सदगीर यांच्या मार्फत सादर केले.
गेल्या काही महिन्यांपासून खरीप आणि रब्बी हंगामावर पावसाच्या विस्कळीत पॅटर्नचा गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न उद्ध्वस्त झाले असून, जमिनी बुडाल्या आहेत. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
सरकारने दिलेल्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने नाराजीचा उद्रेक झाला आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, त्यांनाही केवळ 1,200 ते 1,500 रुपयांची मदत मिळाल्याने त्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. कागदपत्रांची प्रक्रिया करण्यासाठीच हजार रुपयांहून अधिक खर्च येतो, मग अशा मदतीचा उपयोग काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या परिस्थितीविरोधात आवाज उठवत मालेगावमधील शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “कर्जमाफीची मागणी मान्य होईपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही.”
शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून दिलेले “संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन” पुन्हा आठवण करून दिले आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा असंतोषाची लाट उसळल्याचे चित्र दिसत आहे.










