India Morning News
मुंबई : दिवाळी २० की २१ ऑक्टोबरला साजरी करायची, यावर सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या पंचांगांमधील तिथींच्या भिन्नतेमुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र, काशी विद्वत परिषदेनं स्पष्ट भूमिका घेत सांगितलं आहे की, यावर्षी दिवाळीचा मुख्य सण २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) या दिवशीच साजरा करण्यात यावा.
काशीतील धर्मशास्त्र व ज्योतिष विषयातील प्राध्यापक आणि परिषद सदस्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. गणनापद्धती आणि शास्त्रीय निकषांच्या आधारे घेतलेल्या निर्णयानुसार, प्रदोषकाळ व्यापिनी अमावस्या तिथी फक्त २० ऑक्टोबरलाच प्राप्त होत आहे. त्यामुळे हाच दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य असल्याचं परिषदेनं जाहीर केलं आहे.
२१ ऑक्टोबर रोजी तीन प्रहरांपेक्षा जास्त अमावस्या आणि त्यानंतर वृद्धिगामिनी प्रतिपदा सुरू होत असल्याने त्या दिवशी नक्त व्रत किंवा पारणाचा योग्य कालावधी उपलब्ध नाही, असा निष्कर्ष विद्वानांनी काढला. त्यामुळे परिषदेने सर्वसंमतीने २० ऑक्टोबरलाच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
२०२४ मध्येही असा संभ्रम निर्माण झाला होता-
काशी हिंदू विद्यापीठाचे प्रा. रामनारायण द्विवेदी यांनी सांगितले की, सनातन धर्मातील सर्व सण-उत्सव हे गणितीय गणना आणि धर्मशास्त्रीय नियमांवर आधारित असतात. काही पंचांगांतील लहान फरकांमुळे तिथी बदलल्यासारखी वाटते. अशाच प्रकारचा गोंधळ २०२४ मध्येही झाला होता, परंतु काशी विद्वत परिषदेच्या निर्णयानुसार देशभर दिवाळी एकाच दिवशी साजरी झाली होती.
यंदाही काही पंचांगांमध्ये २० ऑक्टोबर, तर काहींमध्ये २१ ऑक्टोबर अशी नोंद आहे. त्यामुळे परिषदेनं पुन्हा एकदा धर्मशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रो. रामचंद्र पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्वानांनी एकमताने निर्णय घेतला की २० ऑक्टोबरलाच लक्ष्मीपूजन करावं.
दिवाळी २०२५ — शुभ मुहूर्त व पूजाकाळ-
द्रिक पंचांगानुसार, अमावस्या तिथीची सुरुवात २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४४ वाजता होईल, तर तिथीची समाप्ती २१ ऑक्टोबरच्या रात्री ९.०३ वाजता होईल.
लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ काळ संध्याकाळी ७.०८ ते ८.१८ असा असेल. हा काळ प्रदोष व स्थिर लग्नाचा संयोग असलेला असल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची उपासना करण्यासाठी अत्यंत मंगल मानला जातो.
म्हणूनच, सर्व श्रद्धाळूंनी २० ऑक्टोबर २०२५ रोजीच दिवाळी साजरी करून लक्ष्मीपूजन करावं, असं काशी विद्वत परिषदेचं आवाहन आहे.










