India Morning News
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट)च्या ताब्यात असलेली ही महापालिका यंदा कोणाच्या हाती जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी (मविआ) एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले?
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांना विचारण्यात आलं की, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीबाबत मविआचा काय निर्णय आहे? त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,सध्या तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात निकाल दिला आहे आणि त्यानुसार प्रक्रिया सुरू होईल. अजून आम्ही यावर बैठक घेतलेली नाही.
एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त
पुढे बोलताना पवार म्हणाले, “महाविकास आघाडीत काँग्रेस, आमची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व असलेली शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि काही इतर छोटे पक्ष आहेत. आम्ही लवकरच एकत्र बसून चर्चा करू आणि एकत्र निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेऊ. आमची इच्छा निश्चितच आहे की मविआ एकत्र लढावी.”
मुंबईबाबत शिवसेनेचं वजन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येणार का, आणि विशेषतः मुंबईत एकत्र लढणार की स्वबळावर, यावर उत्तर देताना पवार म्हणाले,मुंबईत महाविकास आघाडीतील सगळ्यांपेक्षा जास्त बळ शिवसेना (ठाकरे गट) हिचं आहे. त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घ्यावा लागेल.











Comments are closed