India Morning News
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे दसरा मेळावे नेहमीच चर्चेत राहिले असले, तरी यंदाचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ ठरेल, असा दावा ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.
राजकीय चर्चेला उधाण
विशेष म्हणजे, या व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र दिसतील, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अहिर यांनी संकेत दिले की, “दसऱ्याला चांगली बातमी मिळेल. कदाचित उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांनाही निमंत्रण मिळू शकतं. ते आले तर दोन्ही भाऊ एकाच स्टेजवर दिसतील.”
मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई
अहिर पुढे म्हणाले की, मुंबईची परिस्थिती बदलत आहे. आगामी महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. *“उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. ही फक्त राजकीय गरज नाही, तर राज्याच्या भविष्यासाठी आवश्यक आहे,”असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांना नवी दिशा
दसरा मेळावा हा केवळ राजकीय मेळावा नसून, कार्यकर्त्यांना दिशा देणारा आणि मराठी जनतेसाठी प्रेरणादायी असतो. यंदा उद्धव ठाकरे सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करतील. मात्र, जर राज ठाकरेही या मंचावर सहभागी झाले, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरू शकते.









Comments are closed