India Morning News
मुंबई: “योग ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, ती मन, शरीर आणि आत्म्याच्या समन्वयाची भारतीय परंपरेतील शिस्तबद्ध जीवनशैली आहे. जागतिक योग दिन हा योगशास्त्राच्या व्यापकतेचा स्मरणदिवस असला तरी त्याचा खरा सन्मान म्हणजे योगानुसार आयुष्याला शिस्त लावणे,” असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
जागतिक योगदिनानिमित्त डॉ. गोऱ्हे यांनी योग, आयुर्वेद व भारतीय अध्यात्म यांचे परस्पर सुसूत्र संबंध अधोरेखित करत म्हटले की, “भारतीय अभ्यास, चिंतन, मनन आणि चिकित्सा यामध्ये अनुभव आणि विश्लेषण यांचा संगम आहे. त्यामुळेच योग हे तत्त्वज्ञान केवळ पारंपरिक न राहता आधुनिक जगतासाठीही प्रभावी साधन ठरले आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर योगाचा प्रचार करत या विद्येला केंद्रस्थानी आणले, याची त्यांनी प्रशंसा केली. योगशिक्षक मा. अय्यंगार, निंबाळकर गुरुजी, @kdhamyoga संस्था, स्वामी रामदेव बाबा व @SourabhBothra8 यांचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या सर्वांनी योगामार्फत लाखो लोकांना जीवनदृष्टी दिली आहे. महिलांनीही या क्षेत्रात प्रभावी योगदान दिले आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघात, तणाव व मानसिक असंतुलन यामागे संयम, विवेक, रागावर नियंत्रण आणि तांत्रिक अचूकता यांचा अभाव आहे. यावर योग हे प्रभावी उत्तर आहे. योग केवळ शरीराबरोबरच मनालाही प्रशिक्षित करतो.”
शेवटी, योगदिनाच्या निमित्ताने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व योगसाधक, शिक्षक आणि प्रचारकांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.









Comments are closed