India Morning News
मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्यास सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत दिसले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करत स्पष्ट शब्दांत सांगितलं. मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. काय होणार असेल ते होऊ द्या.
जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन करत सांगितलं की, तुम्हाला माझं प्रेम आहे आणि मला तुमचं. कितीही अडचणी आल्या तरी संतुलन राखा. गाड्या मैदानात किंवा पार्किंगला लावा, रेल्वे-एसटीने प्रवास करा. कुठे थांबू दिलं नाही तरी पर्याय शोधून नक्की या. पण कुठल्याही परिस्थितीत गोंधळ घालायचा नाही.
मुंबई हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेत आंदोलनामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावरून जरांगे पाटील म्हणाले, शेवटचं सांगतो, ही लढाई शांततेतच लढायची आहे. मी मरेन तरी तुम्ही शांतच राहा. न्यायव्यवस्था आपल्याला साथ देईल, आपल्याला न्याय मिळवून देईल.
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट संदेश दिला. मी जगतो तोवर आझाद मैदानावरून मागे हटणार नाही, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा ‘शांततेत पण अखंड’ सुरू ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.
Comments are closed