India Morning News
मुंबई: राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं तब्बल ₹३१,६२८ कोटींचं विशेष मदत पॅकेज जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.
या निधीतून पूरग्रस्त भागातील तातडीची मदत, शेती-पशुधन पुनर्वसन, आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी सहाय्य दिलं जाणार आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या २९ जिल्ह्यांना प्राधान्याने मदत पोहोचवली जाईल.
घरं, जनावरे, शेतजमीन आणि सिंचन साधनांच्या नुकसानीसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
-
कोसळलेल्या घरांसाठी ₹१०,००० पर्यंत मदत
-
दुधाळ जनावरांसाठी ₹३७,०००
-
वाहून गेलेल्या जमिनींसाठी ₹४२,००० प्रति हेक्टर सहाय्य
-
प्रत्येक विहिरीसाठी ₹३०,०००
-
ग्रामीण रस्ते, पूल आणि वीजपुरवठ्यासाठी ₹१,५०० कोटी निधी
रब्बी हंगामासाठी बियाणे सहाय्य ₹६,१७५ प्रति हेक्टर, तर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ₹३५,००० आणि बागायतींसाठी ₹५०,००० पर्यंतची मदत दिली जाणार आहे. सुमारे ४५ लाख पीकविमा धारक शेतकऱ्यांना भरपाई जलदगतीने देण्याचा आराखडा तयार झाला आहे.
पात्र लाभार्थ्यांची निवड महसूल विभागाच्या अहवालांवर आधारित असेल आणि थेट खात्यात (DBT) मदत जमा केली जाईल. फसवे दावे टाळण्यासाठी कडक पडताळणी आणि जबाबदारी निश्चितीची यंत्रणा लागू केली जाणार आहे.
पूरग्रस्त भागातील सिंचन व्यवस्था, रस्ते आणि मृदासंधारण दुरुस्तीला प्राधान्य दिलं जाईल. या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळणार असून पुनर्वसनाची गती वाढण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed