India Morning News
नागपूर : ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सतत सांगत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देखील वेळोवेळी ऑनलाइन व्यवहारात सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले जातात. तरीही, देशभरात दररोज अनेक नागरिकांवर सायबर फ्रॉड होतो, जिथे काही लोकांची लाखों रुपयांची फसवणूक केली जाते.
याच पार्श्वभूमीवर, आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑनलाईन आर्थिक व्यवहारात सुरक्षा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या नव्या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये घडणाऱ्या स्कॅम्स आणि फसवणुकीला मोठा धक्का बसणार आहे.
नव्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार?
आरबीआयने ठरवले आहे की ऑनलाईन व्यवहारांसाठी फक्त एसएमएस-आधारित ओटीपीवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. त्याऐवजी, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे व्यवहार करताना अधिक सुरक्षितता सुनिश्चित होईल. हा निर्णय १ एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्षात येईल.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय?
१ एप्रिल २०२६ पासून ऑनलाईन व्यवहार करताना फक्त ओटीपी वापरण्याऐवजी तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा प्रक्रिया पार पाडावी लागेल. या प्रक्रियेत तुमची ओळख पुष्टी करण्यासाठी फोनचा पासवर्ड, बायोमॅट्रिक किंवा अॅप आधारित सुरक्षित प्रणालीचा वापर केला जाईल. यामुळे व्यवहार करणारा व्यक्ती खरोखरच तुम्हीच आहात याची खात्री केली जाईल, आणि ओटीपी व कोड मॅच झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल.
आरबीआयच्या या निर्णयामुळे ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये भविष्यात लक्षणीय घट होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Comments are closed