India Morning News
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाली मंजुरी, ३ सप्टेंबरपासून थांबा सुरू
मोहोळ: कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे थांब्यांपैकी सिद्धेश्वर एक्सप्रेसचा मोहोळ रेल्वे स्टेशनवरील थांबा अखेर पाच वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे. बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ पासून सिद्धेश्वर एक्सप्रेस मोहोळ येथे थांबणार असून, सोलापूरहून मुंबईला जाताना रात्री १०:५३ वाजता आणि मुंबईहून येताना पहाटे ५:३३ वाजता हा थांबा असेल. यामुळे मुंबई, पुणे, दौंडकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लढ्याला यश
कोरोनापूर्वी मोहोळ रेल्वे स्टेशनवर सिद्धेश्वर एक्सप्रेससह चेन्नई मेल, सोलापूर-मिरज आणि पॅसेंजर गाड्यांचे थांबे होते. मात्र, कोरोना काळात रेल्वे व्यवहार ठप्प झाल्याने हे थांबे बंद झाले. इतर ठिकाणी गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू झाले असताना मोहोळ येथे मात्र ही सुविधा मिळत नव्हती. यासाठी सोलापूर लोकसभेचे माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, राज्यसभेचे खासदार धनंजय (मुन्ना) महाडिक, सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. अविनाश काळे, भाजप प्रज्ञावंत आघाडीचे माजी सहसंयोजक अविनाश पांढरे, तालुका संघटन सरचिटणीस महेश सोवनी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
मध्य रेल्वेची पाहणी आणि शिष्टमंडळाची मागणी
डिसेंबर २०२४ मध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मराज मीना यांनी मोहोळ रेल्वे स्टेशनची पाहणी केली होती. यावेळी व्यापारी संघटना, वकील, पत्रकार, विविध राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांनी त्यांच्याकडे बंद पडलेल्या गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत शिष्टमंडळ नेले.
या शिष्टमंडळात शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमा पाटील, काँग्रेस आयच्या महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, पत्रकार आणि निवृत्त प्रा. चंद्रकांत देवकते, काँग्रेस सरचिटणीस संतोष शिंदे, विक्रांत दळवी, ॲड. श्रीरंग लाळे यांचा समावेश होता. या सर्वांच्या मागणीनंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या थांब्याला अंतिम मंजुरी मिळाली.
इतर गाड्यांच्या थांब्यांसाठी पाठपुरावा सुरू
सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या थांब्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, मुंबई-चेन्नई मेल, कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस आणि कोणार्क एक्सप्रेस यांच्या थांब्यांसाठीही मागणी कायम आहे. यासाठी नियमित पाठपुरावा सुरू राहील, असे ॲड. अविनाश काळे आणि अविनाश पांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रवाशांमध्ये उत्साह
सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या थांब्यामुळे मोहोळ परिसरातील प्रवाशांना मुंबई, पुणे, दौंडकडे जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Comments are closed