शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज, सोमवार, 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
परीक्षेची रचना
टीईटी परीक्षेत दोन वेगवेगळे पेपर घेतले जातील
पेपर 1: इयत्ता 1 ली ते 5 वी शिक्षकांसाठी
पेपर 2: इयत्ता 6 वी ते 8 वी शिक्षकांसाठी
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदासाठी ही परीक्षा आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया आणि तारखा
अर्ज सादर करण्याची सुरुवात : 15 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख : 3 ऑक्टोबर 2025
प्रवेशपत्र डाउनलोड : 10 ते 24 नोव्हेंबर 2025
अर्ज https://mahatet.in या संकेतस्थळावरूनच करता येईल. अर्ज करताना उमेदवारांनी आपले रंगीत फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र व स्व-घोषणापत्र स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहे.
परीक्षेचे वेळापत्रक
पेपर 1: सकाळी 10:30 ते दुपारी 1:00
पेपर 2: दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:00
दोन्ही पेपर देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना एकाच केंद्रावर परीक्षा देता येईल. त्यामुळे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या सूचना
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले की, 2018 व 2019 च्या टीईटी परीक्षेत गैरप्रकारात सहभागी होऊन ज्यांची पात्रता रद्द करण्यात आली आहे, अशा विद्यार्थ्यांना यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. खोटी माहिती देऊन अर्ज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.