India Morning News
काबूल : पूर्व अफगाणिस्तानात रविवारी रात्री झालेल्या भीषण भूकंपाने प्रचंड हानी केली असून मृतांचा आकडा 800 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत 3,500 हून अधिक नागरिक जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत.
6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप डोंगराळ भागाला हादरवून गेला. अनेक गावे उद्ध्वस्त झाली, घरे जमिनदोस्त झाली आणि शेकडो लोक रात्रभर ढिगाऱ्याखाली अडकून राहिले. अफगाण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते युसूफ हम्मद यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असून मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो.
भूकंपामुळे काही भागांत भूस्खलन होऊन रस्ते बंद झाले होते, मात्र बचाव कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी रस्ते पुन्हा खुल्या करण्यात येत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात व आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या आपत्तीनंतर भारताने मदतीचा हात तत्काळ पुढे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अफगाण परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी संवाद साधून मदतकार्याबाबत चर्चा केली.
भारताकडून आतापर्यंत 1,000 कुटुंबांसाठी तंबू तसेच 15 टन अन्नसामग्री काबूलहून कुनारपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. आणखी मदत साहित्य पाठवले जाणार असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.
अफगाणिस्तानातील लोकांवर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती गंभीर असून बचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी शेजारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे.
Comments are closed