India Morning News
पुणे: शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील माँ लक्ष्मी मंदिरासमोर आयोजित भव्य महाआरती सोहळा भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याचा मान महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय नामदार माधुरीताई मिसाळ, करण मिसाळ आणि सिंहगड रोड हिंगणे प्रभागातील श्रीकांत जगताप यांच्या शुभहस्ते, तसेच प्रभागातील महिला भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडला.
या मंगलमय प्रसंगी जागरण गोंधळ कार्यक्रमाचे भक्तीमय सादरीकरण झाले. उपस्थित भाविकांनी “जय लक्ष्मी माता” च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून टाकला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीमुळे नवरात्र उत्सवाची शोभा अधिकच खुलली. माँ लक्ष्मीच्या मूर्तीला फुलांचा सुंदर हार, रंगीबेरंगी सजावट आणि दीपप्रज्वलनाने मंदिर परिसर अलौकिक तेजाने उजळून निघाला.
या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक, युवक मंडळे आणि महिला भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांनी सर्व उपस्थित भाविकांचे, तसेच सहभागी कलाकारांचे आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले. या भक्तिमय वातावरणात माँ लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्वांचे मन प्रसन्न झाले. नवरात्र उत्सव पुढील काळातही असाच उत्साहात साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments are closed