India Morning News
पुणे: चित्रपटांद्वारे प्रदर्शित होणारी निसर्गरम्य स्थळे, स्थानिक संस्कृती आणि परंपरा यांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी चित्रपटसृष्टी आणि पर्यटन क्षेत्राचा समन्वय महत्त्वाचा आहे. यातून मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, असा सूर चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात उमटला.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पानशेत येथील सूर्यशिबिर रिसॉर्टमध्ये दोन दिवसीय महोत्सव आयोजित झाला.
महोत्सवात लघुपट व माहितीपटांचे स्क्रीनिंग, चर्चासत्रे, जंगल सफारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. ‘मोलाई: मॅन बिहाइंड द फॉरेस्ट’ या माहितीपटाने आणि ‘शरावथी सांगथ्या’ लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला.
‘गुडवी: मायग्रेटरी बर्ड्स नेस्ट’ आणि ‘मिनी बँक’ यांना अनुक्रमे माहितीपट व लघुपट विभागात द्वितीय क्रमांक मिळाला. धीरज कश्यप आणि याजी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, तर ‘दशावतारी ऑफ कोकण’ला विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले.
‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास आणि पर्यटनातील रोजगार संधी’ यावर परिसंवाद झाले. स्थानिक पर्यटन, रिसॉर्ट मालक आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मेळाव्यात विचारांचे आदानप्रदान झाले. गिरीसागर टूर्सच्या वीणा गोखले यांना जीवनगौरव, तर गेट सेट गो हॉलिडेजचे अमित कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुरस्कार मिळाला.
संयोजक गणेश चप्पलवार म्हणाले, “६१ पैकी १७ निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग झाले. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचेही आयोजन केले.” अभिनेता विठ्ठल काळे म्हणाले, “हा महोत्सव पर्यटन आणि चित्रपट क्षेत्रांना जोडतो, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देतो.”
सूत्रसंचालन आरजे तेजू यांनी, तर आभार असीम त्रिभुवन यांनी मानले.
Comments are closed