India Morning News
दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स’ची घोषणा केली. २२ सप्टेंबर, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणाऱ्या या सुधारणांमुळे देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांना मोठा फायदा होईल. पंतप्रधानांनी सांगितले की, नव्या जीएसटी सुधारणांमुळे रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होतील.
आता फक्त ५% आणि १८% असे दोनच कर स्लॅब राहतील. खाद्यपदार्थ, औषधे, साबण, टूथपेस्ट, विमा यासारख्या अनेक वस्तू आणि सेवांवर करमुक्त किंवा ५% कर लागेल. यापूर्वी १२% कर असलेल्या ९९% वस्तू आता ५% कराच्या कक्षेत येतील.
मोदींनी २०१४ पूर्वीच्या जटिल करप्रणालीचा उल्लेख करत सांगितले की, ऑक्ट्रॉय, सेल्स टॅक्स, एक्साइज यासारख्या अनेक करांमुळे व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असे. जीएसटीने ‘वन नेशन, वन टॅक्स’चे स्वप्न साकार केले. यंदाच्या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईल, गुंतवणूक वाढेल आणि सर्व राज्यांना विकासात समान संधी मिळेल.
त्यांनी ‘स्वदेशी’चा मंत्र देत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. “गर्व से कहो हम स्वदेशी है,” असे म्हणत त्यांनी प्रत्येक भारतीयाला मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यामुळे लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांना चालना मिळेल.
केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. या ‘बचत उत्सव’मुळे नागरिकांना सुमारे अडीच लाख कोटींची बचत होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
Comments are closed